राम सातपुते -त्रिभुवन धाईंजे भेट ; माळशिरसची समीकरणे बदलणार ; अकलूजकरांना धक्का
सोलापूर : भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. लोकसभेला सोलापूर मध्ये आल्यानंतर विधानसभेला ते शहर मध्य या मतदारसंघात निवडणूक लढवतील अशी शक्यता होती परंतु त्यांनी आपल्या हक्काच्या माळशिरस मतदारसंघातच निवडणूक लढवली. थोडक्या मतांनी पराभव झाला पण ते याच मतदारसंघात आता ठाण मांडून आहेत.
माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवण्यासाठी सातपुते यांनी कंबर कसली आहे. मोहिते पाटलांवर नाराज गट भाजपच्या जवळ जाताना पाहायला मिळते. दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, आंबेडकरी नेते त्रिभुवन धाईंजे आणि राम सातपुते यांची वेळापूर मध्ये भेट झाली. सातपुते यांनी त्यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या भेटीनंतर धाईंजे हे भारतीय जनता पार्टीत जाणार का? अशी चर्चा माळशिरस मतदारसंघात सुरू झाली आहे.
धाईंजे हे 2017 मध्ये वेळापूर जिल्हा परिषद गटातून सदस्य झाले होते. तेव्हा ते मोहिते पाटील समर्थक होते. 2019 ला मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर धाईंजे हे राष्ट्रवादीसोबतच राहिले. त्याचा त्यांना मोठा फटका बसला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मोठी संधी त्यांच्याकडून हुकली.
पुन्हा 2024 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना सहकार्य केले. ते अनुसूचित जाती माळशिरस विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी केली परंतु पक्षाने उत्तम जानकर यांना उमेदवारी दिली. धाईंजे यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली आहे. माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी समाजातील आक्रमक आणि अभ्यासू नेता म्हणून धाईंजे यांची ओळख आहे.
सातपुते यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर धाईंजे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. हा मोहिते पाटील गटाला मोठा धक्का असेल. धाईंजे हे भाजपमध्ये आल्यानंतर माळशिरस मध्ये आंबेडकरी समाजाची मोठी ताकद भाजपच्या पाठीशी राहील हे मात्र निश्चित.