राम सातपुते की प्रणिती शिंदे ; सोलापूरच्या दोन राजकीय ‘प्रशांत’मध्ये लागली 1 लाख रुपयाची पैज
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन आता दहा दिवस झाले असले तरी कोण निवडून येणार याची उत्सुकता अजूनही कमी झालेली नाही. चहा टपरी असेल, कट्ट्यावर असेल, चौकात असेल किंवा शासकीय कार्यालयात सुद्धा सोलापुरात प्रणिती शिंदे कि राम सातपुते कोण येणार असे प्रश्न विचारले जात आहेत. आता तर लाखोच्या पैजा ही लागल्या आहेत विशेष म्हणजे ही पैज नागरिकांमधून नाही तर राजकीय नेत्यांमध्ये लागली आहे.
एका प्रादेशिक वृत्तवाहिनीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे युवकचे प्रदेश नेते प्रशांत बाबर यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत मध्ये इतका जोश होता की शेवटी त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी एक लाख रुपये पैज लावली आहे.
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्या तर प्रशांत इंगळे यांनी बाबर यांना एक लाख रुपये द्यायचे आणि राम सातपुते हे जर विजयी झाले तर प्रशांत बाबर यांनी इंगळे यांना एक लाख रुपये द्यायचे असे आता ठरल्याचे पाहायला मिळाले.
इंगळे तर वाजत गाजत हलगी लावून पैसे घ्यायला जाणार आहेत मात्र बाबर हे सोलापूर शांतता राहावे म्हणून आपण कोणतेही ढोल बाजा वाजवणार नाही असे सांगून शांततेत पैसे आणायला जाऊ असे मजेशीरपणे सांगितले. यावरून या निवडणूक निकालाची नागरिक असतील की राजकीय नेते यांच्यात किती उत्सुकता आहे याचा प्रत्यय येतो.