राहुल गांधींच्या सभेचे वादळ सोलापुरात घोंगावले ! राहुल यांच्या सभेला तुफान गर्दी
सोलापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विराट सभा सोलापुरात संपन्न झाली. सुमारे पन्नास हजार पेक्षा अधिक नागरिक या सभेला उपस्थित राहण्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी या नावाचे वादळ सोलापुरात आल्याची चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे.
काँग्रेसचे आमदार इंडिया आघाडीचा उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सोलापुरातील एझ्यूबीशन सेंटर मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेने राहुल गांधी यांनी सोलापूरकरांची मने जिंकण्याचे पाहायला मिळाले.
उपस्थित विराट समुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी महिला, बेरोजगार युवक, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्षाच्या योजना सांगितल्या. महिलांच्या तर खात्यावर प्रत्येक महिन्याला आठ हजार प्रमाणे वर्षाला एक लाख रुपये खटाखट खटाखट येणार असल्याचे सांगताच महिलांमधून टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. बेरोजगार युवकांना सुद्धा त्यांनी नोकरीचे ठोस आश्वासन दिले आहे. देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना कर्जमाफीची मोठी घोषणा त्यांनी केली, मोदींनी २२ अब्जाधीश बनविले, पण आम्ही कोट्यवधी गरिबांना लखपती बनविणार असल्याची सर्वात मोठी घोषणा त्यांनी केली.
41 अंश डिग्री तापमानातही जनसागर उसळला
बुधवारी सोलापूरच्या तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. दिवसभरात 41.2 अंश सेल्सिअस इतके तापमान, उन्हाची लाहीलाही व घामाच्या धारा वाहत असतानाही राहुल गांधी यांची सभा ऐकण्यासाठी शहर व जिल्हयातून जनसागर उसळला होता. सभा दुपारी तीन वाजताची नियोजित असताना नागरिक दुपारी 12 वाजल्यापासूनच सभास्थानी येत होते. जिकडे तिकडे कार्यकर्ते व नागरिकांच्या हाती महाविकास आघाडीतील काँग्रेससह मित्र पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, माकप, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीचे झेंडे व फलक दिसत होते. मरिआई चौकानजिकचे एक्झिबिशन मैदान गर्दीने खचाखच भरले होते. विशेष करून युवक व महिलांची संख्या लक्षणीय होती.