प्रकाश आंबेडकर आज सोलापूर मुक्कामी ; हायहोल्टेज सभेने देणार भाजप- काँग्रेसला टेन्शन
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे गुरुवार दोन मे रोजी सोलापुरात मुक्कामी येत आहेत. तत्पूर्वी दुपारी तीन वाजता कुंभारवेस परिसरातील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या सभेमुळे आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.
सोलापूर लोकसभा राखी मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती त्यांनी उमेदवारी अर्ज भरला काही प्रमाणात प्रचारही केला परंतु उमेदवारी अर्ज माघारच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेऊन राजकारणात सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा लढवणाऱ्या अपक्ष उमेदवार अतिश मोहन बनसोडे या युवकाला पाठिंबा देत पुरस्कृत केले आहे. त्यामुळे सोलापूर मतदारसंघात पुन्हा वंचित बहुजन आघाडी चर्चेत आली आहे.
आतिश बनसोडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी होणाऱ्या सभेला राज्यभरातून पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी सोलापूर निरीक्षक सोमनाथ साळुंखे, क्रांतीताई सावंत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महिला आघाडीच्या पल्लवी सुरवसे, विक्रांत गायकवाड, विनोद इंगळे, आजरुद्दीन शेख, संघपाल काकडे, अनिरुद्ध वाघमारे, प्रशांत गोणेवार, गौतम थापटे हे प्रयत्न करीत आहे.
सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात सरळ सरळ दुरंगी लढत होत असल्याचे पाहायला मिळते. एकीकडे भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रचार करत असून त्या जोडीला संविधानाचा आधार घेत आंबेडकरी समाजाची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे संविधान वाचवण्याच्या भूमिकेतून काँग्रेस यांनी लढा सुरू ठेवला असून काँग्रेसनेही 2019 वेळी न मिळालेल्या आंबेडकरी समाजाच्या मतावर आपली अपेक्षा ठेवली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर सोलापुरात कशा पद्धतीचे वातावरण तयार होणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.