राजकीय गणेशोत्सव ! पालकमंत्री गेले दिलीप मालकांकडे अन् सुभाष बापूंनी बोलावले चंद्रकांतदादांना
सोलापूर : मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचा गोंधळ सुरू असतानाच सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते, मंत्री, आमदार हे गणपती पूजेला सर्वत्र पाहायला मिळत आहेत.
एकाच दिवशी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील व राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापुरात होते. या दोघांनी सोलापूर शहर जिल्हासह अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. अनेक गणेश मूर्तीच्या पूजा या दोघांनी केल्या. काही ठिकाणी हे दोन्ही नेते एकाच वेळी पूजेला पण पाहायला मिळाले.

परंतु पालकमंत्री जयकुमार गोरे हे आपले जुने मित्र, माजी आमदार दिलीप माने यांच्या ब्रह्मदेवदादा माने बँकेत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तीच्या पूजेला आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते. दिलीप माने यांच्यासह त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने आणि बँकेचे संचालक मंडळ तसेच मालकांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले.
इकडे पालकमंत्री दिलीप माने यांच्या बँकेतील गणपतीच्या पूजेला गेले असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाच्या पूजेला गेले होते. आमदार बापू यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांनी दादांचे मनोभावे स्वागत केले.
हेच दोन्ही नेते पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयात एकत्र पाहायला मिळाले. या दोघांनी एकत्रित भाजप कार्यालयात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तीची पूजा केली. पहिल्यांदाच भाजप कार्यालयात अनेक आमदार, मंत्री यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.