एकशे दहा वर्ष माळशिरस मध्येच राहणार ; राम सातपुते यांची गर्जना, विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा तयार रहा
सोलापूर: भारतीय जनता पार्टीचे नेते माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते.
माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांनीं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.
उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राम सातपुते यांनी उपस्थितांमध्ये ऊर्जा भरली.
या ठिकाणी आलेले कार्यकर्त्यांची गर्दी म्हणजे कुठला साखर कारखाना किंवा दूध संघाचे सभासद नाहीत तर मागील पाच वर्षात राम सातपुते यांनी माणसे जोडली त्याची गर्दी आहे.
विरोधकांकडून राम सातपुतेंबाबत वाईट प्रचार केला जात आहे की राम सातपुते यांनी निवडणुकीत घर विकले, आता तर ते किती दिवस राहणार असे ही बोलले जात आहे, परंतु आयुष्य शंभर वर्षाचे असते, मी माळशिरसकरांची पाच वर्षात केलेली सेवा त्याचे पुढील वाढणारे दहा वर्ष आयुष्य यामुळे मी 110 वर्ष माळशिरस मध्येच राहणार असे ठासून सांगताना कार्यकर्त्यांना माळशिरस विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
राम सातपुतेंसाठी रिपाइं कोट्यातून विधान परिषदेची मागणी करणार
माळशिरस तालुक्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी आपल्या भाषणात सातपुते यांच्या कार्याचे कौतुक केले. लवकरच विधान परिषदेवर राम सातपुते यांची आमदार म्हणून निवड होईल असे म्हणताच सातपुते यांनी रिपाईच्या कोट्यातून देणार का? असा प्रश्न केला. त्यावर सरतापे यांनी भाऊ यापूर्वीही तुम्हाला आमदारकीचे तिकीट रिपाईच्या कोट्यातूनच मिळाले होते आताही आम्ही विधान परिषदेसाठी रिपाईच्या कोट्यातून आमदारकी द्यावी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
राम सातपुते आमदार तेव्हा अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री..
माळशिरस राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील यांनी राम सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जेव्हा भाऊ तुम्ही आमदार व्हाल त्याच वेळेस अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अजित पवार यांना राज्याचा मुख्यमंत्री करतील असेही ते म्हणाले.