सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ज रा चंडक प्रशाला बाळे येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री दत्तप्रशालेचा विद्यार्थी कुमार भंडारे यांनी तयार केलेला अल्ट्रासाउंड डिस्टन्स मेजरमेंट या उपकरणाची सोलापूर जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यास संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सुरवसे व प्रशालेतील शिक्षिका सुवर्णा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, कस्तुरबाई शिक्षण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिक्षण तज्ञ ह.ना.जगताप, सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्या हस्ते कुमार भंडारे व सुवर्णा जाधव यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर ठोकळ प्रशालेच्या संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ, सिद्धेश्वर मेहत्रे, नीलकंठ जवळकोठे, विस्तार अधिकारी राजशेखर नागणसूरे, मुख्याध्यापक संघाचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष सुभाष माने, माजी विस्तार अधिकारी अशोक भांजे, मुख्याध्यापक सातलिंग शटगार, विस्तार अधिकारी स्वामी, राठोड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी आदी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनामध्ये सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थी व शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेले होते अनेक शाळेने भेटी देऊन या विज्ञान प्रदर्शनाची प्रदर्शनाची पाहणी केली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी व विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी अशा प्रकारचे विज्ञान परिषदेचे आयोजन सोलापूर जिल्हा परिषद मार्फत केले जाते.
कुमार भंडारे या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नागनाथ सुरवसे, उपाध्यक्ष श्रीपाद सुरवसे, सचिवा संजीवनी पडवळकर, सागर सुरवसे, साने गुरुजीं प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चैताली जोगदार, श्री दत्त मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शिवपूजे, श्री दत्तप्रशालेचे मुख्याध्यापक सातलिंग शटगार आदीने या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.