नेता कसा असावा? झेडपीतील राजेश देशपांडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात संघटनेच्या नेत्यांची भाषणबाजी रंगली !
सोलापूर : जिल्हा परिषदेतील विधी कक्षाचे राजेश देशपांडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त गुरुवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला विविध संघटनांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्या लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सेवानिवृत्ती निमित्त राजेश देशपांडे यांचा सपत्निक सत्कार केला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज, कास्त्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर, आरोग्य कर्मचारी संघटनेचे वाय पी कांबळे, लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे गिरीश जाधव, बहुजन महासंघाचे दिनेश बनसोडे, रमाकांत साळुंखे,कृषी संघटनेचे सचिन चव्हाण यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी संघटना मध्ये कोण भारी यासाठी कायमच चढाओढ पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने देशपांडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार कार्यक्रमात नेता कसा असावा? यावरून नेत्यांनी एकमेकांना चांगले चिमटे काढले. लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे यांनी आपल्या भाषणात नेता कसा असावा? असे वारंवार समोरच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारून उत्तरे घेतली. यातून नकळत त्यांनी काही संघटनांच्या नेत्यांना चिमटे काढले.
नंतर भाषणाला उठलेल्या झेडपी कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज यांनी पण नेता कसा असावा? याची व्याख्या सांगून एक प्रकारे सर्वांनाच शाल जोडे मारले.