सोलापूर : सामाजिक कार्यातून आपली स्वतःची एक ओळख निर्माण केलेले एम के फाउंडेशनचे संस्थापक तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांची राजकीय वर्तुळात कायमच चर्चा होताना दिसते.
दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे ते शिष्य मानले जातात. एकूणच दक्षिण सोलापूर तालुक्यात त्यांचे कार्य पाहता ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते. जळीत कुटुंबासाठी तर ते कायमच धावून जातात अनेक कुटुंबाचे संसार उभे करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसेच शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी नुकतीच महादेव कोगनुरे यांची त्यांच्या विजापूर रोडवरील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते आणि कोगनुरे यांच्या निवासस्थानी कसे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले की, उद्योजक युवराज राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात संतोष पवार आणि महादेव कोगनुरे यांची भेट झाली. त्यावेळी कोगनुरे यांनी पवार आणि बागवान यांना चहासाठी इन्व्हाईट केले होते. त्यांचे कार्य आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांचे कोगनुरे यांनी आदरातिथ्य केले.