सोलापुरात राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा ; ‘महापौरांकडून अपेक्षा ‘ लिहा आणि व्यक्त व्हा
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सोलापुरात एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ती स्पर्धा म्हणजे सोलापूरच्या विकासाशी निगडित आहे. त्या स्पर्धेचा विषय सोलापूरच्या महापौराकडून अपेक्षा हा ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी याविषयी बोलताना सांगितले, सोलापूरच्या जनतेने मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता दिली. त्यांच्या महापौरांकडून सोलापूरकरांना अनेक अपेक्षा होत्या. दिवसाआड सोलापूरला पाणी द्यायचे, स्मार्ट सिटीचा विषय यासह विकासाचे अनेक विषय घेऊन भाजपने सत्ता मिळवली परंतु सोलापूरकरांचा अपेक्षाभंग भाजपने केला.
आता भविष्यात सोलापूर शहराच्या भावी महापौराकडून काय अपेक्षा असाव्यात यासाठी आम्ही स्पर्धेचे आयोजन केले आहे. 15 ऑगस्ट च्या पूर्वी स्पर्धा होईल. स्पर्धा ही खुल्या गटात राहणार असल्याने सर्वांनाच भाग घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
निबंध आणि वक्तृत्व अशा दोन स्वरूपात स्पर्धा असेल. प्रत्येकी केवळ दीडशे जणांना सहभाग नोंदवता येणार असून दोन्ही स्पर्धेला प्रत्येकी पहिले अकरा हजार, दुसरे 7000, आणि तिसरे पाच हजार रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये बक्षीस वितरण करण्याचे नियोजन असल्याचे खरटमल म्हणाले.