राष्ट्रवादीच्या कार्यालयात असे काय घडले? सायंकाळी लगेच शहराध्यक्ष खरटमल यांनी दिला राजीनामा
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी ला मिळालेल्या यशानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तीनही पक्षाला चांगले वातावरण तयार झाले आहे. राज्यांमध्ये सत्ता येण्यासाठी शरदचंद्र पवार हे प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षांमध्ये सोलापुरात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पक्षातील गटबाजी आणि किरकिरीला वैतागून सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
सुधीर खरटमल यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा असाच अचानक दिला होता परंतु त्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा कशामुळे दिला गेला याची चर्चा सोमवारी संपूर्ण सोलापुरात ऐकण्यास मिळत आहेत अधिक माहिती घेतली असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून समजले की, पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे अर्ज मागवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना दहा हजार रुपये असेल पक्षाने ठरवले आहे.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात अध्यक्ष खरटमल यांनी बैठक बोलावली होती त्या बैठकीला महेश कोठे, भारत जाधव, यु एन बेरिया असे काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यानंतर काही वेळाने कार्याध्यक्ष तौफिक शेख आले त्यांनी अध्यक्षांवर आपली तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
“मला बैठकीला बोलावले जात नाही, निमंत्रण दिले जात नाही, मी कार्याध्यक्ष असून काय फायदा, पद्माकर काळे आणि मला विश्वासात का घेतले जात नाही, फक्त शहर उत्तरचाच विचार होतो. शहर मध्य मध्ये इच्छुक असणाऱ्यांना विचारात घेतले जात नाही अशा भाषेमध्ये त्यांनी आपली नाराजी अध्यक्ष खरटमल यांच्यासमोर व्यक्त केल्याचे समजते.
खरटमल यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु शेख हे ऐकण्याच्या मुड मध्ये नव्हते.
याचवेळी नाराज झालेल्या खरटमल यांनी आपले कार्यकर्ते राहुल बोळकोटे यांना तातडीने माझा राजीनामा तयार करा, तो प्रदेश कार्यालयाला आणि महेश कोठे यांना देतो असे म्हणून ते सुद्धा एकूणच पक्षात चाललेली गटबाजी आणि होत असलेल्या त्रासाला कंटाळल्याचे दिसून आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी उपस्थित कार्यकर्ते सांगत आहेत.