

राष्ट्रवादी, एमआयएम फुस्स ; 16 मध्ये भाजप काँग्रेसमध्येच लढत, शिवसेना दिसेना
सोलापूर : महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येणार आहे. अनेक प्रभागात तिरंगी ते चौरंगी लढत होत असून प्रभाग क्रमांक 16 चे चित्र यावेळेस वेगळे आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल या ऐनवेळी एमआयएम पक्षात गेल्याने तिथं काँग्रेसने माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सुनबाई सीमा मनोज यलगुलवार यांना मैदानात उतरवले आहे.
उमेदवारी अर्ज छाननी मध्ये एमआयएम पक्षाचे अनुसूचित जातीमधील उमेदवार नागेश कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीतील अनुसूचित जातीमधील विवेक खरटमल तसेच इरफान शेख हे दोन्ही उमेदवार यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले त्यामुळे निवडणुकीपूर्वीच एमआयएम आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.
काँग्रेसकडून सीमा यलगुलवार, प्राध्यापक नरसिंह असादे, बिल्कीस बानो दफेदार, आणि माजी नगरसेवक नरसिंग कोळी यांचा पॅनल मैदानात आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कडून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, श्वेता खरात, कल्पना कदम, रतीकांत कमलापुरे हे निवडणूक लढवत आहेत.
एमआयएम तर्फे माजी नगरसेवक गाझी जहागीरदार आणि फिरदौस पटेल असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख यांच्या कन्या या उमेदवार आहेत.
एमआयएम आणि राष्ट्रवादी अर्धी गार झाल्याने त्यांची ताकद कमी झाली असून आता या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून फिरदौस पटेल आणि नरसिंग कोळी हे तर भाजपतर्फे संतोष भोसले आणि मीनाक्षी कंपली हे दोघे विजयी झाले होते. फिरदौस पटेल या एमआयएम मध्ये गेल्या आहेत, त्यामुळे इतर समाजाची मते कितपत त्यांना मिळणार हा मोठा प्रश्न आहे.
सामाजिक समीकरणे पाहता मुस्लिम समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर मोची, आंबेडकरी समाज आहे. सीमा यलगुलवार या प्रकाश यलगुलवार यांच्या सुनबाई आहेत. त्यांचे माहेर मोदी भागात आहे त्या ब्राह्मण आहेत ते त्यांचे प्लस पॉइंट आहे. नरसिंह असादे यांचे मोची समाजात चांगली ओळख आहे. बिल्कीस बानो दफेदार या मुस्लिम समाजातील असल्याने त्यांची ओळख आहे. नरसिंग कोळी हे ओबीसी प्रवर्गातील असून मागील पाच वर्षांपासून त्यांची ओळख आहे.
या उलट भाजपने दिलीप कोल्हे यांना बाहेरून आयात केले आहे. खरात, कदम आणि कमलापुरे हे स्थानिक असले तरी मुस्लिम आणि आंबेडकरी समाज कितपत मतदान करणार हा प्रश्न आहे. शिवसेनेचे पॅनल असले तरी त्यांची प्रभागात क्रेझ जाणवत नाही.





















