सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदाची निवड अजूनही केली गेली नाही. त्यासाठी माजी कार्याध्यक्ष संतोष पवार व माजी युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नावाची चर्चा असून बागवान हे सोलापूर शहरातील 30 ज्येष्ठ आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत हे सर्वश्रेष्ठ मंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली.
अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे विभाजन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्याने निवडी सुरू झाल्या. नुकतेच सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी दिपक साळुंखे पाटील यांची नियुक्ती झाली, तसेच शहर युवक अध्यक्षपदी सुहास कदम यांना संधी मिळाली. आता शहराचा अध्यक्ष कोण होणार याकडे नजरा लागल्या आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सांभाळणारे संतोष पवार हेच अध्यक्ष व्हावेत अशी अपेक्षा सर्वच कार्यकर्त्यांना आहे. स्वतः जुबेर बागवान हे शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असेल तरी संतोष पवार यांच्यासाठी ते आग्रही आहेत.
जिल्हाध्यक्ष मराठा, शहर युवक अध्यक्ष मराठा आता शहराध्यक्ष मराठा करायचा का? असा प्रश्न पक्षश्रेष्ठी समोर आहे. त्यामुळे संतोष भाऊ नाही तर मुस्लीम समाजातील जुबेर बागवान यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान शहर अध्यक्ष तसेच इतर निवडी लवकरात लवकर व्हाव्यात म्हणून जुबेर बागवान हे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार यांच्या नेतृत्वाखाली 30 जणांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. सायंकाळी त्यांची भेट अजित पवारांशी होणार आहे.