खासदार प्रणिती शिंदे यांचे ते वक्तव्य ; आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या वतीने मागितली माफी
सोलापूर : पहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत सोमवारी तमाशा संबोधणे अयोग्य आहे. खासदार प्रणिती शिंदे पात्रता नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असा आरोप करीत मंगळवारी भाजपाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध केला. आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन झाले.
यावेळी गाढवाला खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिमा लावण्यात आली होती. प्रणिती शिंदे यांचा धिक्कार असो, भारतमाता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवराय अशा घोषणा याप्रसंगी देण्यात येत होत्या. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे या स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी अशी वक्तव्ये त्या करतात. पहेलगाम येथील हल्ल्यात अनेक माता-भगिनींच्यासमोर त्यांच्या पतींची हत्या झाली. त्यांचे सिंदूर पुसले गेले. त्यामुळे साहजिकच देशात या विरोधात तीव्र भावना होत्या. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनचे सर्व जगाने कौतुक केले. सर्व पक्षांनीही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून कारवाईचे समर्थन केले. परंतु सभागृहाचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी असे बेताल वक्तव्य केलेले आहे. ज्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून दिले, त्यांनाही आता या गोष्टीची लाज वाटत असेल.
खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही हिंदूंना दहशतवादी म्हणत भगवा दहशतवाद शब्द वापरला होता. तसेच अफजलजी, कसाबजी असे चुकीचे शब्दही वापरले होते. परंतु कालांतराने त्यांनी देशाची क्षमाही मागितली. परंतु खासदार प्रणिती शिंदे यांचा स्वभाव पाहता त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या क्षमा मागणार नाहीत. सोलापूरच्या लोकप्रतिनिधीने हे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे सोलापूरचे रहिवासी असल्यामुळे आम्ही संपूर्ण सोलापूरकरांच्यावतीने आणि भाजपाच्यावतीने देशाच्या सैन्यदलाची माफी मागत आहोत, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले. संपूर्ण देश शूरवीर सैन्यदलाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा असताना खासदारांनी अशी वक्तव्य करणे निषेधार्ह आहे, अशी टीका आमदार कोठे यांनी यावेळी केली.
लोकप्रतिनिधींनी संसदेत विकासावर बोलणे अपेक्षित आहे. खासदार प्रणिती शिंदे यापूर्वी तीन वेळा आमदार राहिलेल्या आहेत आणि आता खासदार आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी केलेले एकही काम दाखवलेले नाही. वर्षभरात त्यांनी किती निधी आणला हे त्यांनी जनतेसमोर सांगितलेले नाही. परंतु भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईला तमाशा संबोधण्याचे त्यांचे वक्तव्य गाढवापेक्षाही पुढच्या अकलीचे आहे. आमचा तमाशा या शब्दावर तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे गाढवाला त्यांची प्रतिमा लावून आम्ही निषेध नोंदवला आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, रंजिता चाकोते, संगीता खंदारे, लक्ष्मी बदलापुरे, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, देवेंद्र भंडारे, मेघनाथ येमूल, अनिल पल्ली, भरतसिंग बडूरवाले, रवी कोळेकर, रुपेश जक्कल, अंबादास बिंगी, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, नागेश खरात, बजरंग कुलकर्णी, मनोज कलशेट्टी, श्रीनिवास जोगी, संदीप जाधव, मधुकर वडनाल, विजय कुलथे, दत्तात्रय पोसा, आनंद बिर्रू, रामदास मगर, शिवा कामाठी, अभिषेक चिंता, यशवंत पाथरूट, संदीप ढगे, बंटी क्षीरसागर, गणेश साळुंखे, सागर अतनुरे, सतीश तमशेट्टी, सिद्धेश्वर कमटम, अंबादास सकीनाल आदी उपस्थित होते.