मनसेचे महादेव कोगनुरे यांचा शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल
सोलापूर : दक्षिण मधील लिंगायत समाजाचे नेते महादेव कोगणुरे यांनी काँग्रेस पक्षातून उमेदवारी न मिळालेले नाराज होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून मनसेचे इंजिन खाली घेतले. त्यांना राज ठाकरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी दिली.
सोमवारी महादेव कोगनुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे दाखल केला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनोद्दिन शेख यांची उपस्थिती होती.
यावेळी कोगनूरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना या मतदारसंघात मागील अनेक वर्षापासून एम के फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्य केले, अनेकांच्या मदतीला धावून गेलो हीच पावती आपणाला या निवडणुकीत मिळणार असून आपला विजय निश्चित आहे आणि आपण या मतदारसंघात चमत्कार घडवणार असा दावा कोगणुरे यांनी केला.