आ. विजयकुमार देशमुख व महेश कोठे समर्थकांमध्ये हाणामारी ; दोन्ही नेते पोलीस ठाण्यात ठाण मांडून, काँग्रेसचे चेतन नरोटे कोठेंच्या मदतीला धावून
सोलापूर : विडी घरकुल येथील वैष्णव मारूती मंदिरापासून ते राज इंग्लिश मिडीयम स्कूलपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरुन शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील नेते माजी महापौर महेश कोठे समर्थक व या भागातील भाजपाचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख, महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाचे समर्थक बराच वेळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून असल्याचे समजले.
ही घटना झाल्याचे समजतात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात महेश कोठे यांच्या मदतीला गेले.
या हाणामारीत सतीश कल्लाप्पा भरमशेट्टी व लक्ष्मी सतीश भरमशेट्टी राहणार : सरवदे नगर मुळेगाव रोड सोलापूर असे दोघे जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी अधिक माहिती दिली.
दरम्यान याप्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही मात्र माध्यमांशी बोलताना महेश कोठे म्हणाले, मी आता उत्तर मधून निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भाजपला पोटदुखी सुरू झाली आहे. आमचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही पण आजपर्यंत भाजपचे पाच खासदार झाले स्वतः विजयकुमार देशमुख हे वीस वर्षापासून आमदार आहेत, त्यांनी किती निधी विडी घरकुल भागात दिला ? आताच त्यांना विडी घरकुल कसे काय दिसले. जाणीवपूर्वक विविध घरकुल भागातील नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.