सुभाष देशमुख यांचा लाडका सचिन झाला शिवसेनेचा सोलापूर शहर प्रमुख ; अनेकांना राजकीय धक्का
सोलापूर : बंजारा समाजातील चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे नातू सचिन चव्हाण यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सोलापूर शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सोलापुरात अनेकांना राजकीय धक्का बसल्याचे ऐकण्यास मिळत आहे त्याला कारणही तसेच आहे.
मुळात चव्हाण कुटुंब हे काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक समजले जायचे. परंतु 2017 च्या महापालिका निवडणूक मध्ये सचिन चव्हाण यांच्या भगिनी अश्विनी चव्हाण या भारतीय जनता पार्टी कडून नगरसेविका झाल्या. त्यानंतर या भागात बरीच समीकरणे बदलली.
दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून सचिन चव्हाण यांची ओळख आहे. असे असताना सचिन हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख झाले आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सचिन चव्हाण यांना सोलापूर शहर प्रमुख पदाचे पत्र देण्यात आले. या फोटोमध्ये जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे दिसत आहेत त्यावरून या निवडीमध्ये मनीष काळजे यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे पाहायला मिळते.
याप्रकरणी शिवसेनेच्या काही नेत्यांना विचारले असता त्यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. नूतन शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता आपण मागील सहा महिन्यापासूनच शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि एकनाथ शिंदे यांची ध्येयधोरणे आणि विचारसरणी यावर आपण प्रभावित झालो आहोत. त्यामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी माझ्यावर सोलापूर शहराची अतिशय महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून सोलापुरात शिवसेना मजबूत करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.