आमदार सुभाष देशमुख आमसभेत पोलिसांवर संतापले ; झेडपीच्या डॉनचे कौतुक ; सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास
सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या वतीने वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्षस्थानी जेष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख होते. सहअध्यक्ष म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि काही अधिकारी उपस्थित होते.
तीन वर्षाच्या गॅपनंतर होत असलेल्या या आमसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावागावातून कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आमसभेवर भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व दिसून आले. विरोधी पार्टीचे कार्यकर्ते पाहायलाही मिळाले नाहीत.
या आमसभेमध्ये पोलीस प्रशासन सर्वाधिक लक्ष्य झाल्याचे दिसून आले. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये चालणारे अवैध धंदे, देशी दारू विक्री, मटका, बेकायदेशीर कत्तलखाने यावर उपस्थित नागरिक, कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले.
कार्यकर्त्यांपेक्षा स्वतः आमदार सुभाष देशमुख हेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज दिसून आले. विशेष करून मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालत असलेल्या अवैध धंद्याबाबत सर्वाधिक तक्रारी आल्या. त्या पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऐवजी पोलीस उपनिरीक्षक बैठकीला आल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सुद्धा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयात ते गंभीर दिसून आले, शेतकऱ्यांना लागणारी वीज, रस्ते, पाणी याविषयी अधिकाऱ्यांना त्यांनी सक्त सूचना केल्या.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांच्या गैरहजेरीवरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळाले. त्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असाच पवित्रा घेत गोंधळ घातला. याच वेळी वाढत चाललेला गोंधळ आणि आक्रमक कार्यकर्ते पाहून आमदार कल्याणशेट्टी यांनी या विषयात मी आणि सुभाष बापू दोघे एकत्र बसून यावर ठोस निर्णय घेऊ असे सांगताच सर्वजण शांत झाले.
आमदार सुभाष देशमुख यांनी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्या कामकाजाचे भर सभागृहात कौतुक केले. कटकधोंड यांचे काम तालुक्यात अतिशय चांगले आहे. कामकाज करताना ते समन्वयाने निर्णय घेतात, त्यांनाही अडचणी आहेत, त्यामुळे त्यांना समजून घ्या, कामात अडचणी निर्माण करू नका या शब्दात कौतुक केले. भर सभागृहात आपले एवढे कौतुक झाल्याने स्वतः कटकधोंड यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.