आ. प्रणिती शिंदे भाजपच्या हाती लागेना ; अमर साबळे, राम सातपुते यांची नावे येऊ लागली चर्चेत
सोलापूर : सोलापुरातील काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या भाजपकडूनच निवडणूक लढवतील अशी चर्चा खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे. परंतु प्रणिती शिंदे या काही केल्या भाजपच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी कडून सोलापूर अनुसूचित जाती या राखीव मतदार संघासाठी माजी खासदार अमर साबळे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची नावे पुन्हा चर्चेत आली आहेत.
मागील दहा वर्षात सोलापूर मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी अपेक्षित असे काम केले नसल्याने आणि या खासदारांमुळे भारतीय जनता पार्टीची प्रचंड बदनामी झाल्याने यावेळी सोलापुरातील स्थानिक आणि ओरिजनल जातीचा दाखला असलेल्या उमेदवाराला भाजपने तिकीट द्यावे अशी मागणीने जोर धरला.
त्यातच काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी केल्याने भाजप समोर मोठा पेज निर्माण झाला जर आमदार प्रणिती शिंदे यांनाच भाजपमध्ये घेतले आणि उमेदवारी दिली तर एका दगडात दोन पक्षी भाजप मारेल अशीही चर्चा होती. भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील बऱ्याच नेत्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटी घेऊन भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळाली पण प्रणिती शिंदे या स्वतः भाजपकडून लढण्यास इच्छुक नसल्याचेही समजते.
काही दिवसात आचारसंहिता लागेल भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. आता दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा होईल त्यातच सोलापूर लोकसभेसाठी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची नावे पुन्हा चर्चेत आली आहेत.
अमर साबळे यांची नाळ मागील सहा वर्षांपासून सोलापूरशी जोडलेली आहे. सोलापूर लोकसभेचा त्यांचा चांगला अभ्यास झालेला असल्याने त्यांच्या नावाला सोलापूर शहर जिल्ह्यातील स्थानिक भाजपच्या नेत्यांचा विरोध नसल्याचेही ऐकण्यास मिळते. बऱ्याच लोकांमध्ये ते फिरतात बोलतात चर्चा करतात, विविध समाजाच्या घटकांमध्ये मिसळतात, माध्यमांसोबत ही त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांच्या नावाचा भाजप नक्कीच विचार करू शकतो.
राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात मागील पाच वर्षात विकास कामाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या टच मध्ये ते राहिले आहेत. सभागृहात ते कायम आक्रमक असतात त्यामुळे त्यांचाही विचार भाजप करू शकतो.