सोलापूर : सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाच्या जीवावर मोठे झालेले अनेक कार्यकर्ते आहेत. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून दिला. त्यांना मोठे केले. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
“ताई मी हे केलो, ताई मी ते केलं, ताई मी असे म्हणालो, ताई मी तसे म्हणालो,” परंतु ताईंच्या वाढदिवसानिमित्त मी काय केलं? हे मात्र काँग्रेसच्या जीवावर मोठे झालेल्या कार्यकर्त्यांना सांगता येत नाही. मागील तीन वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्षामध्ये आलेले सुरेश हसापुरे यांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काय केले हे सर्व वर्तमानपत्रे सांगतीलच. त्यांनी कोणत्याही माध्यमाला नाराज केलेले दिसत नाही.
सोलापूर महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षाच्या नावावर मोठे झालेले नेते अजूनही संकुचित वृत्ती असल्याचे दिसून येते. यामध्ये काहींनी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पद भूषवले. कोट्यवधी कमावले, काँग्रेसच्या जीवावर महापालिकेचे सभापतीपद घेतले, आजही त्या सभापतीचा फायदा आर्थिक जोरावर बेकायदेशीररित्या घेतला जातो. काही महत्त्वाच्या जमिनीवर आपला हक्क सांगून बराच पैसा कमविला जात आहे.
शहर मध्य मध्ये काँग्रेसच्या जोरावर सुद्धा बेकायदेशीररित्या दोन नंबर धंदे करून बरेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठे झालेले आहेत. अजूनही त्यांचे व्यवसाय चालत आहेत. काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक होऊन स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीवेळी पैसे घेऊन गायब होणारे सदस्यही याच पक्षात आहेत. परंतु त्यांच्याकडून आपल्या ताईंसाठी काहीही होताना दिसत नाही. काही पोटनिवडणुकीमध्ये स्वतःची ऐपत नसताना केवळ काँग्रेस पक्षाच्या जोरावर निवडून येऊन स्वतःला फिक्स मेंबर म्हणवून घेणारे कार्यकर्तेही याच काँग्रेस पक्षात आहेत.
आमच्या ताई, प्रणिती ताई असे म्हणून दिखाऊपणा करणारे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र अशा दिखाऊपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच ओळखले आहे. येणारी लोकसभा निवडणूक त्या लढवणार आहेत. आतापासूनच त्यांना ‘भावी खासदार’ म्हणून संबोधले जात आहे परंतु अशा दिखाऊपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून त्यांनी वेळेत सावध राहिले पाहिजे हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.