सोलापुरात मोची समाजाला आमदारकीची संधी ; बाबा करगुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा
सोलापूर : सोलापूर शहर मध्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने आता या मतदारसंघातून अनेकांना संधी उपलब्ध झाली आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मागील तीन निवडणुकांमध्ये मध्य या मतदारसंघातील मोची समाजाने सर्वाधिक मते देऊन त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले.
एक गठ्ठामध्ये असल्याने मोची समाजाची मते ही निर्णायक ठरतात. आज पर्यंत सोलापूर शहरातून मोठी समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने आता मोची समाजातून अनेक कार्यकर्त्यांची नावे समोर येत आहेत परंतु खासदार प्रणिती शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जाणारे अंबादास बाबा करगुळे यांच्या नावाची समाजातून जोरदार चर्चा ऐकण्यास मिळते.
श्री आदि जांबमुनि महाराज रथोत्सव मध्ये प्रणिती शिंदे या खासदार होण्याच्या पूर्वीच अंबादास करगुळे यांनी भावी आमदार म्हणून चर्चेला तोंड फोडले होते. आता प्रणिती शिंदे खासदार झाल्याने पुन्हा बाबा करगुळे यांनी समाजात फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
करगुळे यांचे घराणे कट्टर काँग्रेस समर्थक मानले जाते. यापूर्वी अंबादास करगुळे यांचे वडील सायबण्णा करगुळे त्यांच्या आई हनमंतीबाई करगुळे यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. आता करगुळे यांच्या पत्नी वैष्णवी करगुळे यांनीही नगरसेविका म्हणून पाच वर्षे चांगले काम केले.
युवक अध्यक्ष असताना बाबा करगुळे यांनी सोलापूर शहरांमध्ये युवकांमध्ये काँग्रेस रुजवली. मोची समाजातील युवकांमध्येही अंबादास करगुळे यांची क्रेझ आहे, आंबेडकरी समाज सुद्धा करगुळे परिवाराला मानतो, भविष्यात पक्षाने विचार केला तर मोची समाजातून अंबादास करगुळे हे चांगला चेहरा होऊ शकतात.