“अण्णांचा विषय लयं हार्ड हाय, अण्णांकडे ‘मध्य’चे कार्ड हाय” ; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूटची चिन्हे
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे शहर उत्तर मधून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत. शहरात पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. परंतु हे करत असताना त्यांना पक्षाचे कुठेही सहकार्य नाही अशी कुरबुर ऐकण्यास मिळत आहे. उलट पक्षात शहर उत्तर मधून ऐन वेळेस धर्मराज काडादी हेच उमेदवार राहतील अशी बातमी पसरवली जात असल्याचे बोलले जात आहे.
पक्षातील नेते महेश कोठे यांना मोठा धक्का देण्याची तयारी करत असल्याची चाहूल लागल्याने महेश कोठे यांचे विश्वासू कार्यकर्त्यांची गोपनीय बैठकीत चर्चा झाली. अण्णा तुम्ही शहर उत्तर ऐवजी शहर मध्य मधून शिवसेनेकडून निवडणूक लढावी अशी सूचना करण्यात आली. आता महेश कोठे काय निर्णय घेतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महेश कोठे यांच्याबाबत शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या भूमिकेतही काहीसा बदल पाहायला मिळत आहे. शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या कार्यक्रमाला स्वतः महेश कोठे यांच्यासह त्यांचे समर्थक कोणीही उपस्थित नव्हते. दरम्यान पत्रकारांनी खरटमल यांना कोठे यांच्या बाबत विचारले असता ते आले नाहीत मी त्यांना फोनही करायचा विसरलो असे उत्तर त्यांनी दिले.
आता तर महेश कोठे यांच्या समर्थकांमधून असे आरोप होत आहेत की, खरटमल यांना पक्ष संघटना वाढवण्यात कोणताही रस नाही, शहराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. खरटमल सध्या आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी मी याला आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आणतो असे म्हणण्यात मशगुल असल्याची चर्चा आहे.
शहर उत्तर मध्ये पद्मशाली किंवा लिंगायत समाजाचा चेहरा चालतो. कोठे याना सोडले तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विजयाच्या जवळपास जाणारा दुसरा कुणी दिसत नाही. वरिष्ठ नेत्यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे असून महेश कोठे पक्ष सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला तर नवल वाटू नये.