सोलापूरात एक तास महाविकास आघाडी निशब्द ; नंतर घोषणाबाजी अन् भाषणाने सांगता
सोलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ एक तास निषेध आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले.
त्यानुसार सोलापुरात काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर तब्बल एक तास तोंडाला मानेला दंडाला काळ्याफिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आले.
एक तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
नंतर मार्क्सवादीचे माजी आमदार आडम मास्तर, शिवसेनेचे अजय दासरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरिया काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करताना उच्च न्यायालयाच्या कारभारावर नेत्यांनी ताशेरे ओढले.
या आंदोलनात माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, काँग्रेसचे बाबा मिस्त्री, सुदीप चाकोते, उदय चाकोते, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष सुनिता रोटे, काँग्रेसच्या फिरदौस पटेल, काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, काँग्रेसचे विनोद भोसले, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, सुशील बंदपट्टे, अंबादास करगुळे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे महादेव कोगनुरे, माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे अशोक निम्बर्गी, माकपचे एम एच शेख, अशोक देवकते, मकबूल मोहोळकर, संध्या काळे, राष्ट्रवादीचे प्रमोद गायकवाड, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, अलका राठोड, पुनम बनसोडे, श्रीशैल रणधिरे, एन. के क्षिरसागर, माकपचे अनिल वासमp यांच्यासह चारही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जमायत ए तंजीम संघटनेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.