प्रणिती शिंदेंसमोर महादेव कोगनुरे यांचे शक्तीप्रदर्शन ; लोकसभेत साथ दिली भविष्यात साथ देण्याचा प्रणितींचा शब्द
महादेव कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत. गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल. लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन मला साथ दिली आहे. भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असा शब्द नुतन खासदार प्रणिती शिंदे यांनी येथे बोलताना दिला.
सागर सिमेंट व एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्यावतीने कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिध्देश्वर साखर कारखाना सोलापूर येथे दोन लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम घेऊन कोगनुरे यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी शिवपुत्र महास्वामी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, धर्मराज काडादी, दत्तात्रय मुळे, सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, सिध्दाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच एम के फाउंडेशन व सागर सिमेंटचे पदाधिकारी सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे. या संधीचे सोनं करण्याचे काम मी नक्कीच करेन यासाठी तुमचे सदैव साथ माझ्या पाठीशी असणे गरजेचे आहेत.
यावेळी धर्मराज काडादी बोलताना म्हणाले, लहान वयात महादेव कोगनुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य व मदत देऊन त्यांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे महादेव कोगनुरे यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादेव कोगनुरे म्हणाले, सामाजिक कार्य करत असताना आज ही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते. याकडे मी दुर्लक्ष करीत मी माझ्या सामाजिक ऋण फेडण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगितले.
यावेळी सिध्दाराम चाकोते, अशोक देवकते आदींनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले तर उपस्थितांचे आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले.