ब्रेकिंग : माढ्यातून भाजप तर्फे पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी ; मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे परंतु मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
यंदा माढा लोकसभा मतदारसंघातून माळशिरसचे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी मोहिते पाटील परिवार अतिशय आक्रमक दिसून आला. ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन धर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जोर लावल्याचे पाहायला मिळाले.
कार्यकर्त्यांनी सुद्धा यंदा धैर्यशील मोहिते पाटील हेच आपले खासदार असतील अशी बॅनरबाजी केल्याचे दिसून आले. यंदा काही करून लोकसभेची उमेदवारी मिळवायचीच अशा भूमिकेत मोहिते पाटील परिवार होता. परंतु आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
2019 साली संजयमामा शिंदे यांनी मोहिते पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आणली होती पण त्यावेळी मोहिते पाटील परिवारांनी भाजपला दिलेल्या शब्दांनुसार माळशिरस तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना तब्बल एक लाख 13 हजार इतके मताधिक्य दिले होते. त्यामतांच्या जोरावरच संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला होता.