सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली 3 जानेवारी हा बालिका दिन असल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आगळावेगळा असा उपक्रम जिल्हा परिषदेमध्ये सुरू केला असून मुलीच्या नावाचे नामफलक तयार केले आणि ज्या अधिकाऱ्यांना मुली आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना भेट दिले. आपल्या स्वतःच्या मुलीचे नाम फलक पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह सर्वच अधिकारी या सुद्धा भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रकल्प संचालक अमोल जाधव, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता पारसेकर, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सीईओ आव्हाळे यांनी आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्या, तिला तिच्या पायावर उभे करा असे आवाहन केले. मुलगी शिकली तर निश्चितच त्या घराची प्रगती होते तुम्ही माझे स्वतःचे उदाहरण पाहू शकता, माझ्या गावात माझी थट्टा झाली होती परंतु ते मी सर्व खोडून काढले.
प्रारंभी प्रास्ताविकात मिरकले यांनी सांगितले की, राज्य सरकारने नुकतेच नवे महिला धोरण जाहीर केले आहे त्या धोरणामध्ये आता मुला किंवा मुलीच्या नंतर वडिलांचे नाव होते परंतु आता शासनाच्या कागदपत्रांवर वडिलांपूर्वी आईचे नाव सुद्धा घेतले जाणार आहे. त्यामुळेच महिला बालकल्याण विभागाच्या वतीने मुलीच्या नावाची पाटी तयार करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतल्याचे सांगितले.