“काय राव जगताप” लक्ष्मी दर्शना शिवाय फायली हलत नाहीत म्हणे ; कागद ‘कोरे’च राहू लागले टेबलावर
सोलापूर : सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभाग अतिशय बदनाम झालेला. मागील दोन वर्षात या विभागातील शिक्षणाधिकारी पदाच्या खुर्चीसाठी अक्षरशः संगीत खुर्ची पाहायला मिळाली. माध्यमिक शिक्षण विभागातून दिलेल्या शिक्षकांच्या बेकायदेशीर मान्यता हा तर विषय राज्यात चव्हाट्यावर आलेला त्यात सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्याही चौकशा लागलेल्या आहेत.
वर्धा जिल्ह्यात अतिशय चांगले काम करून राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून पाठ थोपवून घेणारे सचिन जगताप आता माध्यमिकचे शिक्षणाधिकारी आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहिली असता सध्यातरी बरी वाटते. अतिशय बारकाईने ते फाईल वाचतात, शिक्षक संघटनांच्या तक्रारीही त्यांच्यामुळे कमी झाल्याचे पाहायला मिळते. आता आचारसंहिता अंशतः शिथिल झाल्याने शिक्षण विभागाने अनुकंपा तत्त्वावरील शिक्षण सेवक यांना नियुक्ती देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या कार्यालयात फाईलची रेलचेल वाढल्याचे पाहायला मिळते.
शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे माध्यमिक शिक्षण विभागाला शिस्त लावण्याचे काम करत आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता याबाबत ते वारंवार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागणी करतात अजूनही त्यांची मागणी पूर्ण झाल्याचे दिसत नाही.
दरम्यान या विभागातील लिपिकांकडून लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय फायली पुढे सरकत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. कार्यालयातील फाईल मधील कागद अजूनही ‘कोरे’च आहेत. जोपर्यंत फाईलवर वजन ठेवले जात नाही तोपर्यंत फाईल पुढे सरकत नसल्याची कुरबुर ऐकण्यास मिळते.
अनुकंपाच्या त्रुटी पूर्ततेसाठी सुद्धा या ठिकाणी लक्ष्मी दर्शनाची मागणी होते. ती झाल्याशिवाय साहेब सहीच करत नाहीत असे एक प्रकारे शिक्षकांना सांगून दम दिला जात असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. माध्यमिक मधील आवक जावक रजिस्टर ऑनलाईन करणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली, त्याचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.