आढळले दुर्मिळ ऊद मांजर ; उत्तर सोलापूर तालुक्याच्या या गावात, शेतकऱ्याने घेतली खबरदारी
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काठी या या गावातील अरुण शिंदे या शेतकऱ्याच्या शेतात दुर्मिळ असे उद मांजर आढळले आहे. अरुण शिंदे यांनी त्या प्राण्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले असून असा प्राणी पहिल्यांदाच गावात पाहायला मिळाला आहे असे सांगितले.
दरम्यान रानातील भटक्या कुत्र्यांपासून या प्राण्यांचे संरक्षण होण्यासाठी त्यांनी त्या प्राण्यावर लक्ष ठेवले आहे. प्राणी मित्र आणि पत्रकार इमरान सागरी यांना ही माहिती देण्यात आली त्यांनी तातडीने नेचर कंजर्वेशन सर्कल चे भरत छेडा यांना माहिती देऊन त्यांची रेस्क्यू टीम गावाकडे पाठवल्याचे समजले.
ऊद मांजर हा प्राणी भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आणि भारताबाहेर ब्रम्हदेश, इंडोचायना आणि मलायात आढळतो.
याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो. उदाची लांबी (डोके व धड) ६५–७५ सेंमी., शेपूट ४०–४५ सेंमी. आणि वजन ७–११ किग्रॅ. असते.
ऊद मांजरऊद मांजर मूळ सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी वायव्य भारतातील वाळवंट, मध्य भारतातील शुष्क प्रदेश आणि महाराष्ट्र या भागांतही तो राहू शकतो कारण या प्रदेशांच्या हवापाण्याशी त्याचे अनुकूलन झालेले असते. सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर हा राहतो. याचे मुख्य भक्ष्य मासे, परंतु ते मिळाले नाहीत तर सहज पकडून खाता येतील असे कोणतेही प्राणी त्याला चालतात. खाड्या, नदीमुखे वगैरे ठिकाणी हा भक्ष्य शोधीत असतो. मध्य भारताच्या शुष्क प्रदेशातील तळी, ओढे वगैरे आटल्यावर ऊद मांजरे जंगलात शिरतात आणि शिकार करून पोट भरतात. पाण्यात आणि जमिनीवर ते सारख्याच सहजतेने राहतात. यांच्या प्रजोत्पादनाच्या काळाविषयी किंवा त्या काळातील यांच्या वर्तनाविषयी काहीही माहिती नाही. वर्षाच्या सुरुवातीच्या काळात पिल्ले जन्मल्याचे आढळते.