सोलापूर जिल्हा परिषदेत “रात्रीचा खेळ आता दिवसा चालू लागला” ; तो ग्रुप झाला पुन्हा सक्रिय
सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्रिभुवन धाइंजे यांनी जिल्हा परिषदेतील काही सदस्यांच्या लुडबुडीवर नाराजी व्यक्त करताना यांचा रात्रीस खेळ चालतो अशी टीका करून चर्चेला तोंड फोडले होते. तेव्हापासून जिल्हा परिषदेमध्ये रात्रीच खेळ चाले हा शब्द प्रचलित झाला.
जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राज येऊन सुमारे दोन वर्षे झाले आहेत. त्यामुळे सर्व कामकाज आता प्रशासक पाहतात. माजी जिल्हा परिषद सदस्यांना कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. जिल्ह्यातील आमदारांच्या याद्यांशिवाय कोणताही निधी इतरांना मिळत नाही.
असे असतानाही जिल्हा परिषदेतील काही माजी सदस्य रोजच जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळत आहेत. कधी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये तर कधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्या चेंबरमध्ये आणि ग्रामपंचायत विभागाच्या कार्यालयामध्ये तर कधी लघुपाटबंधारे विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागात हे माजी सदस्य फिरताना दिसतात. अधिकाऱ्यांची मन धरणी करून काही काम आपल्या वाट्याला येतील का यासाठी ही यांचा खटाटोप पाहायला मिळतो. मार्च एंड आणि लोकसभेची आचारसंहिता जवळ आल्याने काही माजी सदस्य आता चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येऊ लागले आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कारभाराचे ज्ञान नसलेले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याचा फायदा घेत तसेच माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार राजेंद्र राऊत आणि मोहिते पाटील या नावांचा दबदबा आणि वलयावर जिल्हा परिषदेतील काही सदस्यांनी अधिकाऱ्यांवर आपली वचक बसवून चांगलाच मलिदा मारल्याचे पाहायला मिळाले. यांची तर टोळी आता झेडपीत सक्रिय पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. या ग्रुपमधील एक नेता मास्टरमाइंड असून दोघा- तिघांना अधिकाऱ्यांच्या अंगावर सोडायचे आणि स्वतः ‘आनंद’ घ्यायचा असा त्यांचा नित्यक्रम यापूर्वी चालत आल्याचे सर्वांनी पाहिले आहे.