गहिवरलेल्या वातावरणात विवेक लिंगराज यांच्या आठवणींना उजाळा ; राजेश देशपांडे यांची ही महत्वाची मागणी
सोलापूर : जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांचा अपघाती मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या निधनाबद्दल शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय गहिवरलेल्या वातावरणात विवेक लिंगराज यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. अनेक महिला कर्मचाऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांच्यासह प्रशासनातील सर्वच प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण प्रशासन लिंगराज परिवाराच्या पाठीशी कायम राहील अशी ग्वाही जंगम यांनी परिवाराला दिली.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते राजेश देशपांडे यांनी मात्र आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहताना लिंगराज यांनी जिल्हा परिषदेमध्ये सर्वत्र वृक्षारोपण केले आज जी हिरवळ आणि झाडी दिसते त्याचे श्रेय त्यांनाच जाते म्हणून झेडपीतील उद्यानाला विवेक उद्यान असे नाव द्यावे ही विनंती प्रशासनाला केली.
अनेक कर्मचारी संघटनेचे नेते यावेळी उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाकडे विनंती करताना लिंगराज यांच्या परिवाराला यापुढे जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही फेऱ्या माराव्या लागणार नाहीत याची काळजी घ्यावी हीच खरी श्रद्धांजली असेल अशी अपेक्षा व्यक्त केली.