आमच्या डोक्याला फुकटचा ताप का ! कोंडगुळे की सोनकांबळे? बांधकाम विभाग निर्णय घेईना
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गटात असलेल्या कनिष्ठ अभियंता कोंडगुळे यांचा चार्ज काढून तो चार्ज सोनकांबळे या कनिष्ठ अभियंत्याला देण्यात आला. दक्षिण सोलापूर बांधकाम विभागाच्या उप अभियंता बिटला यांनी हा चार्ज काढला होता. बिटला आणि कोंडगुळे यांच्यात झालेल्या वादामुळे सध्या बोरामनी भागात प्रचंड गोंधळ उडाला आहे.
सोनकांबळे की कोंडगुळे या गोंधळात मक्तेदार असून त्यांच्या डोक्याला फुकटचा ताप झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मार्च एंड असल्याने निधी खर्च होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या हालचाली वाढल्या आहेत.
त्यामुळे कामे लवकरात लवकर व्हावी त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे परंतु असे असताना जे काम मक्तेदार करत आहेत तिथे कोंडगुळे आणि सोनकांबळे या दोघांत कोण हा वाद अजूनही मिटलेला नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उप अभियंता बीटला यांना कोंडगुळे यांच्याकडे चार्ज ठेवण्याच्या सूचना देऊनही त्या ऐकण्यास तयार नाहीत. सीईओ यांनी सांगितल्याने आता कोंडगुळे थेट फिल्डवर जावून मापे घेत असून कामकाज करताना दिसत आहेत परंतु अधिकृत पत्रानुसार सोनकांबळे यांच्याकडे चार्ज असल्याने कोंडगुळे यांचे कामकाज अधिकृत धरण्यात येत नाही असे समजते.
आता या प्रकरणात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घातले असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार कोंडगुळे यांच्याकडे पुन्हा चार्ज द्यावा अशा सूचना कार्यकारी अभियंता खराडे यांना करण्यात आल्या आहेत पण अद्यापही त्याबाबत आदेश निघालेला नसल्याचे दिसून येते.