सोलापुरात मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन ; गटशिक्षणाधिकारी आरबळे यांची वाढणार अडचण
सोलापूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष महांतेश कट्टीमनी यांनी अक्कलकोट तालुक्यांमध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी आरबळे यांनी मनमानी पद्धतीने, अधिकाराचा गैरवापर व आर्थिक देवाणघेवाण करून ज्या प्रतिनियुक्त्या झालेल्या होत्या, त्या विरोधात आवाज उठवला होता, उलट त्यांच्याविरुद्ध चुकीची तक्रार देण्यास लावून कट्टीमनी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी आरबळे यांच्या विरोधात आता मागासवर्गीय शिक्षक संघटना प्रचंड आक्रमक झाले असून मंगळवारी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
चुकीच्या पद्धतीने झालेल्या प्रतिनियुक्ती संदर्भातील चौकशीचा अहवाल लवकरात लवकर संघटनेला देण्यात येऊन संबंधित गटशिक्षणाधिकारी अक्कलकोट व गटविकास अधिकारी अक्कलकोट यांची वरील प्रकरणात चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा संघटना यापुढील कालावधीत न्याय मिळेपर्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे, याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ, पुणे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कारंडे, जिल्हाध्यक्ष शशिकांत खुडे, जिल्हा सरचिटणीस किरण सगेल, अक्कलकोट तालुका अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी, जोशाबा पतसंस्थेचे चेअरमन महेश्वर कांबळे, जिल्हा सल्लागार भाग्यवंत, रजाक शेख, मनपा शहर अध्यक्ष नागेश गोसावी, जिल्हा संघटक अंबादास खराडे, दक्षिण तालुका अध्यक्ष खाजाप्पा बनसोडे, मनपा सदस्य आनंद सामल धीरज कुचेकर आदि पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या आंदोलनाला जिल्हा परिषद महासंघाचे नेते राजेश देशपांडे यांनी पाठिंबा दिला.