सोलापूर झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अख्ख्या DPDC ला बनवले ‘मामा ‘ ; जयाभाऊ लक्ष घाला
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जयकुमार गोरे यांनी आपली छाप टाकली. त्यामुळे या कडक पालकमंत्र्यांची कार्यपद्धती पाहून कामचुकार अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.
पण सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अख्ख्या जिल्हा नियोजन समितीला अन् खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाच मामा बनवल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या सुमारे साडे तीन कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात बनवाबनवी करण्यात आली आहे. शाळा खोल्या दुरुस्तीच्या याद्या घेऊन अनेक महिने प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या.
प्राथमिक शिक्षक विभागाच्या शाळा खोल्या दुरुस्तीच्या प्रशासकीय मान्यतेची फाईल 13 जानेवारी 2024 रोजी सही केल्याचे पत्र पाहायला मिळते परंतु जिल्हा नियोजन समितीची बैठक 30 जानेवारी रोजी झाली 28 व 29 जानेवारी दरम्यान अनेकांच्या शाळा खोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव घेऊन ही यादी तयार करण्यात आली आणि जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या आदल्या दिवशी या प्रशासकीय मान्यता तयार झाल्या. या मान्यतेच्या फाईलवर 13 जानेवारीची तारीख दाखवण्यात आली आहे केवळ पालकमंत्री आणि आमदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न प्राथमिक शिक्षक विभागाने केला आहे असे यावरून स्पष्ट होते.
या टेबलला असलेला लिपिक पटेल यांची भूमिका यामध्ये संशयास्पद वाटत असल्याचे जिल्हा परिषदेमध्ये बोलले जात आहे. तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती. त्यामध्ये सह आरोपी म्हणून पटेल यांनाही पोलिसांनी उचलले परंतु त्यावेळी पत्रकारांच्या बातम्यांमुळे पटेल वाचले अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असती.
या साडेतीन कोटीच्या प्रशासकीय मान्यतांमध्ये ज्या ज्या तालुक्यातील गावे आहेत त्या त्या आमदारांनी ही यादी तपासून घेतल्यास निश्चितच सत्य समोर येईल.
मागील काही दिवसांपासून प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ज्या पद्धतीने जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या चौकशी लावल्या. त्या पद्धतीने प्राथमिक शिक्षण विभागात चाललेल्या सावळ्या गोंधळ याकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.