सोलापूर झेडपी मध्ये आरक्षणाची चर्चा ; अनेकांची तोंड पडली ; पहा जिल्ह्यात कुणाकुणाला बसला धक्का
मागील साडेतीन वर्षापासून जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या समोरील चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या 68 सदस्य पदाचे आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात आली. यामध्ये अनेक इच्छुक दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तर केवळ आरक्षणाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळाली. अनेकांची तोंड पडलेली दिसून आली. यामध्ये विशेष करून उत्तर सोलापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्या गोटात तर अतिशय नाराजी पाहायला मिळाली. त्यांचा नान्नज जिल्हा परिषद गट हा ओबीसी सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने तिथून स्वतः काका साठे किंवा त्यांचे पुत्र जितेंद्र साठे या दोघांनाही निवडणूक लढवता येणार नाही.
दुसरीकडे बीबीदारफळ गट सर्वसाधारण साठी खुला झाल्याने माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पवार यांच्या कार्यकर्त्यांमधून आनंदाचे वातावरण आहे. त्या ठिकाणी भविष्यात ज्येष्ठ पत्रकार अरुण बारस्कर विरोधात इंद्रजीत पवार असा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने तिथून दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने हे निश्चित निवडणूक लढवतील.
दक्षिण सोलापूर तालुक्यात बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे. मंद्रूप किंवा कुंभारी हे दोन जिल्हा परिषद गट जर खुले किंवा ओबीसी सर्वसाधारण झाले असते तर त्या दोन्हीपैकी एका गटातून हसापुरे यांना निवडणूक लढवत आली असती परंतु वळसंग जिल्हा परिषद गट ओबीसी असल्याने भविष्यात हसापुरे यांचा तिथून विचार होऊ शकतो अशी शक्यता आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातून बोरामणी हा एकमेव जिल्हा परिषद गट खुला झाल्याने तिथे सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक नेताजी खंडागळे, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर सिद्धाराम म्हेत्रे समर्थक शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे धनेश आचलारे हे नेते इच्छुक असून यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट तालुक्यात जेऊर आणि पानमंगरूळ हे दोन गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मल्लिकार्जुन पाटील आणि सिद्रामप्पा पाटील यांना धक्के बसले आहेत. माजी पक्षनेता आनंद तानवडे यांचा वागदरी गट ओबीसी झाल्याने पुन्हा त्या ठिकाणाहून तानवडे येथील की पक्ष दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोहोळ तालुक्यात माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे आष्टी व नरखेड हे गट खुले झाल्याने ते पुन्हा सभागृहात दिसतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वाधिक सर्वसाधारण जागा असलेल्या मोहोळमध्ये आता कोण कोण उमेदवार येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
करमाळा तालुक्यातील सहा जागांपैकी पाच जागेवर महिलेचे आरक्षण झाल्याने अनेक इच्छुकांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांचा कुर्डू हा मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने त्या ठिकाणाहून त्यांचे चिरंजीव यशवंत किंवा त्यांचे पुतणे धनराज हे कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता लागली आहे.