सोलापुरात वाहन चोरणाऱ्या उमेश भोसलेला हलवले येरवड्यात
सोलापूर : मागील काही वर्षापासून सातत्याने मोटार सायकल चोरी, प्राणघातक शस्त्राने दुखापत, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेश नागनाथ भोसले याला स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन २६ मार्च रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले. त्याच्या विरुद्ध खंडणी मागणी आणि घातक शस्त्राने धमकाविणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे १२ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
सोलापुरातील फौजदार चावडी, जेलरोड आणि जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत उमेश नागनाथ भोसले (वय २७ वर्षे, रा. बी/११, भगवाननगर झोपडपट्टी, सोलापूर) याची सराईत गुन्हेगार अशी ख्याती आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत आहे. त्यामुळे त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असं पोलिसांचे म्हणणे आहे.
उमेश भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी, सन २०२३ मध्ये क. ११०(ई) (ग) सीआरपीसी अन्वये व सन २०२५ मध्ये क. १२९ बीएनएसएस-२०२३ अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही, उमेश नागनाथ भोसले याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आयुक्त एम. राज कुमार यांनी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले.