सोलापुरात तुतारी वाजली, मशाल पेटेना ; घड्याळ भाजप पासून अजून दूरच ; भाजपला रिपाइं ‘आठवले’च नाही
सोलापूर : यंदाची लोकसभा निवडणूक अनेक बाबींसाठी आठवणीत राहणारी आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी थेट लढत होत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे तीन पक्ष असून महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी यासह इतर मित्र पक्षांमध्ये रामदास आठवले यांची रिपाइं यांचाही समावेश आहे.
सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पूर्ण ताकतीने महाविकास आघाडीचे काम करेल असा आशावाद शहराध्यक्ष सुधीर खरटमल व प्रमुख नेते महेश कोठे यांनी व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रवादीची तुतारी सोलापुरात वाजल्याचे पाहायला मिळाले.
दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अद्यापही प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात कुठेही दिसत नाहीत त्यामुळे त्यांची मशाल अजूनही पेटलेली नाहीच असे चित्र आहे. शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या अध्यक्ष ही भूमिका स्पष्ट झालेल्या नाहीत.
दुसरीकडे महायुतीकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवार जाहीर झाली. त्यांच्या स्वागताला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे उपस्थित दिसून आले. दुसऱ्या दिवशी उमेदवार सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
या कार्यालयाच्या समोरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांचे कार्यालय आहे परंतु आठवले गटाची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने सातपुतेंना रिपाइं आठवलीच नाही असे दिसून आले.
बारामतीच्या जागेवरून अजित पवार यांचे सध्या शिवसेना आणि भाजप सोबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही त्यामुळे सोलापुरात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. तरीही राम सातपुते यांनी मोहोळ तालुक्याचे नेते माजी आमदार राजन पाटील यांचे निवासस्थानी भेट दिली.