पुरुषोत्तम बरडे- चेतन नरोटे यांची भेट ; महायुती विरोधात सर्वपक्षीय आघाडीची बांधणी होणार?
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका च्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे प्रारूप प्रभाग रचना झाल्याने आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केले आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची गुरुवारी काँग्रेस भवनामध्ये भेट झाली. यावेळी माझे नगरसेवक विनोद भोसले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सुशीलकुमार मैत्री पृथ्वीराज नरोटे यांची उपस्थिती होती.
या बैठकी मागील माहिती घेतली असता समजले की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विरोधात सोलापूर शहरात काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना या तीन प्रमुख पक्षात सोबतच एमआयएम पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना एकत्रित घेऊन मोठी आघाडी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनी पुढाकार घ्यावा अशी चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एमआयएमचे खासदार बॅरिस्टर अस्ससुद्दीन ओवेसी यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परदेशात पाठवतात तर सोलापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एमआयएमला सोबत घ्यावे अशी मागणी बरडे यांनी केल्याचे समजले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचीही भूमिका अशीच असून माकप आणि एमआयएम सोबत असल्यास शहरात महाविकास आघाडीची ताकद वाढेल त्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घडवून आणावी अशी मागणी पुढे आली आहे.