सोलापूर : सोलापुरात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधण्यात येऊन समन्वय समिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी आपापसातील मतभेद- वैर कमी करावा हे तोफिक शेख यांचे म्हणणे संजय राऊत यांनाही पटले.
शिवसेनेचे खासदार राऊत हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे, सुधीर खरटमल, शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, पुरुषोत्तम बर्डे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, काँग्रेसचे चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, अशोक निम्बर्गी, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, विनोद भोसले, मनोहर सपाटे, अमर पाटील, प्रमोद गायकवाड, तौफिक शेख, यू एन बेरीया, जनार्दन कारमपुरी, मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांनी आपली मते मांडली सोलापुरात महाविकास आघाडी मजबूत व्हावी यासाठी तीनही पक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यापेक्षा एकत्रितच पंधरा दिवसाला एक मोठा कार्यक्रम घ्यावा, त्यासाठी समन्वय समिती आवश्यक असल्याची मते पुढे आली. काँग्रेसच्या अशोक निम्बर्गी यांनी भाजपवर हल्लाबोल करत भाजप कडून आता फक्त महापालिका विकायची राहिली आहे असा आरोप करीत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
तौफिक शेख यांनी बोलताना समन्वय समिती होईल मात्र इथे बसलेल्या नेत्यांमध्ये परस्पर मतभेद आणि राजकीय वैर आहे ते पहिला संपले पाहिजे तरच महाविकास आघाडी यशस्वी होईल अन्यथा समन्वय समिती स्थापन करूनही काही फायदा होणार नाही.
तोफिक शेख यांचे म्हणणे संजय राऊत यांनाही पटले. त्यांनी ज्या पद्धतीने देशांमध्ये इंडिया आघाडी झाली आहे तशीच महाविकास आघाडी सोलापूर मध्ये झाली पाहिजे, टिकली पाहिजे, तरच आपणाला भाजप सारख्या संविधान विरोधी पक्षाला हरवता येईल.