सोलापुरात कार्यक्रमाला उपस्थिती अन् मुंबईमध्ये घेतला प्रवेश ; विजय देशमुख यांच्या विरोधात उघड प्रचार करणारे पुन्हा भाजपमध्ये
सोलापूर : बुधवारी मुंबई सोलापूर ही विमानसेवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू झाली. त्याच कार्यक्रमाला विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान आमदार तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना समोर येऊन विरोध दर्शवणारे सुरेश पाटील, विजय देशमुख यांना यंदा मतदान करू नका म्हणून लोकांसमोर दंडवत घालणारे बिज्जु प्रधाने, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, माजी स्थायी समिती सभापती पद्माकर नाना काळे, माजी उपमहापौर तथा दीडच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप कोल्हे, सुभाष डांगे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराच्या अध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला अध्यक्ष रंजिता चाकोते या नेत्यांची उपस्थिती होती. प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांसोबत फोटो काढला.
याचवेळी माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार यशवंत पाणी हे सुद्धा नेते त्याठिकाणी एका कामानिमित्त गेले असता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बुधवारीच देवेंद्र फडणवीस सोलापूरला आले होते त्या कार्यक्रमाला माजी सभागृहनेते सुरेश पाटील पूर्वी विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे बिजू प्रधाने हे नेते आवर्जून उपस्थित होते. तसेच दिलीप कोल्हे हे सुद्धा पहिल्या रांगेत बसले होते.
या नेत्यांनी दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये जाऊन आपला भाजप प्रवेश घडवून आणला. मुळात हे सर्वच नेते सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात येतात आणि या मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख आहेत आणि या सर्वांनीच देशमुख यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड आणि उघडपणे विरोध केला होता. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आता विजयकुमार देशमुख हे यांनी नेत्यांबाबत काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.