सोलापुरात प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची प्रभावी अंमलबजावणी ; योजना समजून घ्या
सोलापूर जिल्ह्यात पीएम सूर्य घर योजना अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करणे आहे. सोलापूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वीज वितरण कंपनीला योग्य नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. वीज वितरण कंपनीकडून ही योजना जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकाला पर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन केले जात आहे.
अंमलबजावणी- अर्जांची संख्या : सोलापूर जिल्ह्यात महावितरणच्या पोर्टलवर 9 हजार 539 अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यात 7 हजार 494 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.
– सोलर कामांची प्रगती- 3 हजार 935 सोलर पॅनलचे काम सुरू आहे, तर 3 हजार 557 पॅनलचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित प्रकल्पांचे काम त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले गेले आहेत. पूर्ण झालेल्या कामातून 12.58 मेघा वॅट विजेची निर्मिती सौर ऊर्जेच्या माध्यमातून झालेली आहे.
जनजागृती आणि प्रबोधन-
सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री सुर्य घर योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वीज वितरण कंपनी व संबंधित शासकीय विभाग प्रमुखाच्या नियमितपणे आढावा बैठका घेऊन या योजनेला गती देण्याचे काम केले जात आहे. तसेच बँकांकडून या योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा करताना अडचणी निर्माण करू नये व सुरळीत कर्ज पुरवठा करावा या अनुषंगाने आवश्यक निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी या योजनेच्या कर्ज प्रकरणाच्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घ्यावी असेही त्यांनी सुचित केलेले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण कंपनी ही मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर सौर पॅनल बसविण्याबाबत प्रबोधन करत आहे. या प्रबोधन मोहिमेला सोलापूर शहर पंढरपूर व बार्शी तालुक्यात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे तर उर्वरित तालुक्यातील प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती विविध माध्यमातून केली जात आहे.
वेंडरची स्वतंत्र बैठक-
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेप्रमाणे वीज वितरण कंपनीने जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यग्रहण योजनेची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी होण्यासाठी सौर पॅनल चा पुरवठा करणाऱ्या वेंडरची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात सौर पॅनल पुरवठा करणाऱ्या 28 वेंडरची स्वतंत्र यादी तयार करून नागरिकांनी यापैकी एकाची निवड करून आपल्या घरावर पॅनल बसवण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे.
पात्रता आणि अनुदान
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे, तसेच घराच्या छतावर सोलर रुफ टॉप सिस्टिम बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी लागेल. योजनेसाठी अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत विविध क्षमतेच्या सौर प्रणालीसाठी सबसिडी उपलब्ध आहे, जसे की:
– 0 ते 150 युनिट वापरासाठी 1 ते 2 किलो वॅट क्षमतेची सौर प्रणालीसाठी 30,000 ते 60,000 रुपये सबसिडी.
– 150 ते 300 युनिट वापरासाठी 2 ते 3 किलो वॅट क्षमतेची सौर प्रणालीसाठी 60,000 ते 78,000 रुपये सबसिडी.
– 300 युनिटपेक्षा जास्त वापरासाठी 3 किलो वॅट क्षमतेच्या सौर प्रणालीसाठी 78,000 रुपये सबसिडी
पीएम सूर्य घर योजना सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोफत वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया स्पष्ट करण्यात आलेली आहे. तरी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ लाभ घ्यावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनीही स्वतःहून या योजनेत सहभागी होऊन आपल्या दरमहा विजेचे बिल झिरो करण्यासाठी प्रयत्न करावेत.
लाभार्थी- 1.
महावितरण कंपनीकडून आम्हाला प्रति महिना दीड ते 2 हजार वीज बिल येत होते. ग्रामीण भागात असूनही हे लाईट बिल आमच्यासाठी खूप होते, त्यामुळे आम्ही पर्यायाची विचार करत असताना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेविषयी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली. महावितरण च्या पोर्टलवर अर्ज केला व आमचा अर्ज मंजूर होऊन आठ दिवसातच सौर ऊर्जा पॅनल माझ्या घरावर बसवण्यात आले. तर शासनाकडून अनुदानाची रक्कम 78 हजार रुपये एका महिन्यातच मिळाली. सध्या आम्हाला प्रतिमहिना जे दीड ते दोन हजार लाईट बिल होते येत होते ते *झिरो* झाले आहे. त्यामुळे आमचे आर्थिक बचत होत आहे. आमच्या गावातही 15 ते 16 नागरिकांनी सौर ऊर्जा पॅनल बसवून घेतलेले आहे. उर्वरित नागरिकांनीही सौर पॅनल बसवून या योजनेत सहभागी होऊन आपला विजेवरील खर्च झिरो करण्यासाठी मी आवाहन करते. व ही योजना सर्वसामान्यांसाठी शासनाने लागू केल्याबद्दल त्यांचीही ऋणी आहे.
सौ. नीता कमलाकर जाधव हिपळे, ता. दक्षिण सोलापूर
सुनील सोनटक्के
जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर