सोलापुरातील एकाच कुटुंबातील सलग तीन दिवसात चौघांचा मृत्यू ; ती रात्र आली काळ बनून
सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील नळबाजार चौकात रविवारपासून मंगळवार पर्यंत सलग तीन दिवसात चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. बंद घरात छोट्याशा खोलीमध्ये गॅस गळती झाल्याने ही घटना घडल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. या घटनेत बलरामवाले कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या दुर्घटनेत रविवारी रात्री दोन चिमुकल्यांचा, हर्ष (वय ६ वर्ष) आणि अक्षरा (वय ४ वर्ष) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी (१ सप्टेंबर २०२५) रोजी सकाळी ९:२५ वाजता या चिमुकल्यांच्या आजी विमल मोहनसिंग बलरामवाले (वय ६०) यांचेही निधन झाले होते. त्या तिघांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आता या घटनेत आणखी एक दुख:द बातमी समोर आली आहे. या दोन्ही चिमुकल्यांची आई आणि विमल बलरामवाले यांची सून रंजनाबाई युवराज बलरामवाले (वय ३५) यांचाही आज मंगळवारी (२ सप्टेंबर २०२५) रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या कुटुंबातील शेवटची व्यक्ती युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय ४०) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे लष्कर, बेडरपूल परिसरासह संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने या कुटुंबाला घरासाठी मदत करावी अशी मागणी लोधी समाजातून पुढे आली आहे.