सोलापुरातील डॉल्बीबंदीवर जिल्हा न्यायालयाने दिला हा निकाल
सोलापूर, दि. ४(जिमाका): –गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारा ठरू शकतो, या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक नागरिक, ज्येष्ठ नागरिक व विविध सामाजिक संघटना यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदने सादर केलेली होती.
या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर न करण्याचे आदेश दिले होते. यासह पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनीही डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटवर बंदीचा आदेश काढला होता.
परंतु जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या आदेशा विरोधात योगेश पवार यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, सोलापूर यांच्या कोर्टात स्टे मागितला होता. व जिल्हाधिकारी यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर शो ला घातलेली बंदी ही बेकायदेशीर असल्याने त्याला कोर्टाने स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल केली होती.
परंतु लोकांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर यांच्या कोर्टाने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट शो ला बंदी घातलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साठी जारी केलेले बंदी आदेश कायम राहणार आहेत. शासनाकडून जिल्हा सरकारी वकील एडवोकेट प्रदीप राजपूत यांनी काम पाहिले.
********