सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नवा राजकीय बॉम्ब ; सुधीर खरटमल यांना……
सोलापूर : शहर उत्तर या सोलापुरातील विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वाढलेला दबाव पाहता आणि राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांची संभ्रमा अवस्थेतील भूमिका पाहता शहर उत्तर काँग्रेस पक्षाला सोडून शहर मध्य हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यासाठी राष्ट्रवादीने घ्यावा असा राजकीय बॉम्ब खरटमल यांच्या समर्थकांकडून टाकण्यात आल्याने आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर इच्छुकांची संख्या वाढली आहे सोलापूर शहरातील तीनही मतदार संघात काँग्रेसच्या इच्छुक कार्यकर्त्यांची सर्वाधिक संख्या पाहायला मिळते. शहरातील तीन मतदारसंघापैकी शहर उत्तर हा मतदारसंघ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला जाण्याची शक्यता आहे. तिथून महेश कोठे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी तशी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे ही पाहायला मिळते परंतु कोठे आणि खरटमल यांच्या गटामध्ये धुसफूस समोर येत आहे. खरटमल यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कोठे समर्थकांनी महेश अण्णा यांनी शहर मध्य मधून शिवसेनेच्या वतीने लढावे अशी मागणी करण्यात आल्याने राजकारणात बराच गदारोळ उडाला.
सिंहासनने दिलेल्या या बातमीनंतर एकूणच कोठे गटाची धरसोड भूमिका पाहता सुधीर खरटमल यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहर मध्य मतदार संघ सोडून घ्यावा आणि काँग्रेस पक्षाला शहर उत्तर द्यावा अशा भूमिकेत खरटमल यांचे समर्थक पाहायला मिळाले.
सुधीर खरटमल यांचे संपूर्ण शहरांमध्ये सर्वच राजकीय पक्ष तसेच सर्वच समाजांच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय चांगले संबंध आहेत. विशेष करून शहर मध्य या मतदारसंघात येणाऱ्या मुस्लिम, मोची, लोधी, पद्मशाली, आंबेडकर समाज, रामवाडी सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजामध्ये खरटमल यांची चांगली प्रतिमा आहे. मध्य मध्ये निवडून येणारा उमेदवार हा सर्व समाजाची मते घेऊनच निवडून येऊ शकतो. त्यामुळे खरटमल हे मध्य मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून योग्य उमेदवार म्हणून बसतील अशी भावना आता राष्ट्रवादीतील खरटमल समर्थक कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता पक्षाकडे शहर मध्य खरटमल यांच्यासाठी सुटावा यासाठी जोर लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.