सोलापूरच्या राष्ट्रवादीत खुन्नस ! उमेश पाटलांचे अभिनंदन पण नाही पण राजन पाटलांना मात्र जोरदार शुभेच्छा
सोलापूर : सोलापूरच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जोरदार खुन्नस पाहायला मिळत आहे. सोलापूरची राष्ट्रवादी काँग्रेस गटातटात विभागली गेली आहे. यामुळे निष्ठावंताची चांगलीच गोची होताना दिसून येते. त्यातल्या त्यात महिला पदाधिकाऱ्यांची अडचण झाली असून जायचे कुणाकडे हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.
नुकतेच सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदी उमेश पाटील यांची नियुक्ती झाली. त्याचे सर्व स्तरातून स्वागत झाले, अभिनंदन झाले, सत्कार झाले पण शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्याकडून साधे अभिनंदन किंवा सत्कार पण झाला नाही. उलट या दोन्ही नेत्यांनी माजी आमदार राजन पाटील यांचा वाढदिनी सत्कार जरूर केला. त्याचे फोटो पवार आणि बागवान यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून एकमेकांबद्दल खुन्नस पाहायला मिळत आहे.
एकेकाळी उमेश पाटील, संतोष पवार तसेच जुबेर बागवान हे नेते एकाच विचाराचे पहायला मिळायचे. आनंद चंदनशिवे यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी या सर्वांचा वाटा आहे, अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर असताना आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी त्यांना घेऊन जाण्यासाठी उमेश पाटील, संतोष पवार आणि बागवान यांनी प्रयत्न केला होता पण दादांच्या कानात कुणी काय भरवले होते आणि या तिघांना तोंडघशी कुणी त्यावेळी पडले हे सर्वांना माहीत आहे. हे सर्व घडले ते माजी आमदार दिलीप माने यांच्या फॉर्म हाउस वर.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांमध्ये आता उघड उघड गट तयार झाले आहेत. एकीकडे उमेश पाटील यांचा स्वतंत्र गट असून दुसरीकडे उमेश पाटील यांना विरोध करणारा गट. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही गटबाजी निश्चितच पक्षासाठी धोकादायक ठरणार हे तितकेच खरे आहे.