सोलापूरच्या आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून महेश कोठे यांचे स्वागत शिवसेना म्हणते माफी मागा ; कोठे काय म्हणाले
सोलापूर : महाविकास आघाडीतून सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडून माजी महापौर महेश कोठे यांना उमेदवारी जाहीर झाले आहे. दुसरीकडे दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आले आहे त्यामुळे दिलीप माने यांच्या समर्थकांनी शुक्रवारी बराच गदारोळ घातला त्यानंतर ही जागा काँग्रेसला सुटल्याचे समजल्याने जल्लोष साजरा झाला.
महेश कोठे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला.
दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन महेश कोठे यांना एक प्रकारे विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन महेश कोठे यांच्या पूर्वीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. मागच्या 2019 च्या निवडणुकीत कोठे यांनी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असताना त्या ठिकाणी बंडखोरी केली. पक्षाने उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना केल्या परंतु ते ऐकले नाहीत. त्यानंतर महापालिकेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विविध पदांवर नेमणूक करण्यासाठी सूचना केल्या असतानाही आपल्या विरोधी पक्ष नेते पदाचा गैरवापर करून शिवसेना सोडुन इतर कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यामुळे महेश कोठे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची माफी मागावी तरच आम्ही त्यांचा प्रचार करू असा इशारा दिला आहे.
दरम्यान बरडे यांच्या वक्तव्यावर कोठे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला असता याला मी नक्की उत्तर देईन पण वेळ आल्यावर आता प्रतिक्रिया देऊन त्यांना मोठे का करायचे? असे सांगितले.
दुसरीकडे अमर पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली असताना काँग्रेस पक्षातील नेते बंडखोरीच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवार अमर पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचाही शिवसेनेने ठासून सांगितले.