भावजी असे का हो ! मिसेस आल्या एमआयएमतर्फे निवडून पण मिस्टर गेले राष्ट्रवादीत ; पुण्यात अजित, अण्णांनी साधला बनसोडे योग
सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. 2017 च्या निवडणुकीमध्ये पत्नी एमआयएम या पक्षाकडून निवडून आल्या होत्या परंतु या निवडणुकीत प्रभाग अनुसूचित जाती सर्वसाधारण पडल्याने त्यांचे पती इच्छुक असून त्यांनी ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये अजित बनसोडे यांच्या पत्नी पूनम बनसोडे यांनी त्यावेळी एमआयएम पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली होती. तब्बल हजार मतांनी त्या विजय झाल्या होत्या. प्रभाग 22 मध्ये मुस्लिम आणि आंबेडकर समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत त्याचा फायदा पूनम बनसोडे यांना झाला होता. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. एमआयएम मधील बरेच नगरसेवक सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा तीन दिवसाचा सोलापूर दौरा झाला. त्यादरम्यान अण्णा यांनी सर्व समाजातील नेत्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या होत्या. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांचे मित्र अजित बनसोडे हे सुद्धा अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित झाले.
दोनच दिवसांपूर्वी संतोष पवार, जुबेर बागवान यांच्या उपस्थितीत आणि अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली अजित बनसोडे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अजित बनसोडे हे प्रभाग 22 अनुसूचित जाती सर्वसाधारण मधून इच्छुक आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून निश्चित उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आहे. अजित बनसोडे राष्ट्रवादीत आल्याने दुसरे नगरसेवक माजी गटनेते किसन जाधव यांची सुद्धा ताकद वाढणार आहे.
सध्या महायूतीच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला बळ दिल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे बऱ्याच मुस्लिम समाजातील कार्यकर्ते दादांकडे आकर्षित झाले आहेत.




















