एमआयडीसी हद्दीत मटका तेजीत ; ‘ मेघ’गर्जनेसह ‘कारंजे’ची मटक्यावर फवारणी ; मंथलीच्या नावाखाली खाकी वर्दीची ‘चांदी ‘
सोलापूर : सोलापूर शहरातील अवैध व्यवसायाने पुन्हा जोर धरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस आयुक्तपदी एम राजकुमार हे विराजमान झाल्यावर सोलापूर शहरातील अवैध धंद्यावर त्यांची करडी नजर राहणार असल्याचे बोलले जात होते परंतु एकूणच शहरातील चालू असलेले अवैध व्यवसाय पाहता त्यांची नजर नसल्याचे यावरून स्पष्ट होते.
सोलापूर शहरातील बंद असलेल्या टपऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. आकडेमोड करणाऱ्या पाट्या खुलेआम झळखू लागल्या आहेत. सोलापूर शहरातील विशेषता कामगार वसाहतीमध्ये मटक्याच्या पाट्या लावून अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत तर दुसरीकडे शहरातील मटका तसेच सर्वच प्रकारचे अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा नेहमी पोलीस प्रशासन करत असतो पण तसे होताना दिसत नाही.
शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी, विडी घरकुल, सदर बाजार पोलीस ठाणे आणि विशेषतः एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात असल्याने मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य कामगारांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. आता एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नवीन बुकी चालकांकडून हा मटका व्यवसाय चालवला जात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
स्थानिक पोलीस स्टेशनच्या वसुलदारांकडून हप्ते घेऊन हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे सर्व सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे. सध्या नुकतेच एमआयडीसी परिसरात नव्या बुकी चालकांचे हिम्मत वाढवणारे वसुलदार आहेत कारण यांच्या मदतीशिवाय हे अवैध व्यवसाय चालणे शक्यच नसते. हिम्मत द्यायची मटका सुरू करायला लावायचा नंतर हप्ते वसूल करायचं अशा प्रकारातून ‘तेरी बी चूप, और मेरी बी चूप’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या एमआयडीसी तसेच जोडभावी पेठ परिसरातील हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका हा अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. खाकी वर्दीकडून आर्थिक देवाण घेवाण झाल्याने कारवाई केली जात नाही असं नागरिकांतून बोलत आहेत. सोलापूर शहरांमध्ये जोडभावी पेठ आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ‘ मेघ’गर्जनेसह मटक्यांचा “कारंजे” फवारणारा हा एकमेव व्यक्ती आता नव्याने रुजू झाला आहे. हाच मेघ जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यशस्वी मटक्याचा व्यवसाय करून आता एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मटक्याचे कारंजे फवारत असल्याचे सांगितले जात आहे.
जो तो सर्वसाधारण कर्मचारी मटक्याच्या टपऱ्यावर जाऊन धंदा बंद करा असा दमदाटी देतात परंतु लगेच तो टपरी चालत संबंधित व्यक्तीला फोन करून सांगतो आणि त्यांचा आर्थिक व्यवहार पूर्ण होतो नंतर जैसे ते परिस्थिती आणि मटका खुलेआम चालतो. परंतु याकडे पोलीस आयुक्त एम.राजकुमार हे विशेष लक्ष देतील का हे पहावे लागणार आहे. आपल्या नावात ‘एम. राज’ आहे तसा अवैध धंदे चालकांसाठी यमराज बनून आपण काम करावे हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.