सोलापुरातून ओबीसींचा एल्गार ; आता ओबीसी आमदार, खासदारांच्या….
सोलापूर/ प्रतिनिधी
सध्या ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचे काम सरकारकडून सुरु झाले आहे. केवळ राजकीय दबावापोटी घटनेच्या आणि कायद्याच्या विरोधात जावून मराठा आरक्षणासाठी आणि ओबीसी कुणबी दाखले देण्यासाठीचा जीआर काढण्यात आला आहे. तो जीआर नसून तो मूळ ओबीसींचे आरक्षण संपविणारा काळा कागद आहे. त्यामुळे या विरोधात आता सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटना ही आता अक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन लढाई बरोबरच आता रस्त्यावरच्या लढाईची तयारी ओबीसी संघटनांच्या वतीने सुरु झाली आहे. त्यामुळे ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांची लवकरच शहर जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी भेट घेणार असल्याची माहिती युवराज चुंबळकर यंानी दिली आहे.
रविवारी विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक लष्कर परिसरातील महालिंगराया मंदीरात पार पडली. यावेळी ॲड. राजन दिक्षित, माजी नगरसेवक बबलु गायकवाड, समता परिषदेचे बापू भंडारे, शेखर बंगाळे, माधूरी उन्हाळे, ॲड आर व्ही गुरव, वसंत पोतदार आदी उपस्थित होते. यावेळी ओबीसी समाजावर अन्याय होत आहे.
ओबीसी समाजाचे आरक्षण घालविण्यासाठी सरकारने राजकीय दबावापोटी चुकीचा जीआर काढला आहे. हा जीआर रद्द करावा यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी ही आता ओबीसी संघटनांनी केली आहे. तर दुसरीकडे केवळ बहुसंख्येच्या जोरावर मराठा समाज कुणबीत घुसण्याचा प्रयत्न करित आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आता शिंपी, धनगर, माळी, कोळी, सोनार, वंजारी, बंजारा समाजासह अनेक ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे ओबीसी विरुध्द मराठा असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबैठकीस अशोक पाटील, संतोष सुतार, डी डी पांढरे, प्रतिक्षा चव्हाण, माधवी पोतदार यांच्यासह ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ओबीसी आमदार,खासदार मंत्र्याच्या घरासमोर पहिले आंदोलन : माजी नगरसेवक गायकवाड
सध्या ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले असताना ही ओबीसीचे डझनभर आमदार, खासदार मंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत. मात्र हे आरक्षण संपले तर पुढच्या २५ पिढ्यांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ओबीसीच्या मतावर राजकारण करणारे आमदार खासदार मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत त्यामुळे पहिले आंदोलन या आमदार आणि मंत्र्याच्या घरासमोर करावीत असे आवाहन माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांनी केले.
आरक्षणा संदर्भात वाड्या वस्त्यावर जावून जागृती करु
घटनेने दिलेल्या आरक्षणाचा लाभ आता पर्यंत ओबीसीच्या तळागाळातील लोकांना मिळालेला नाही तो पर्यंत आरक्षण काढून घेण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे विविध समाजाच्या ओबीसी संघटनांनी हे आरक्षण आणि याचे महत्व समाजातील तळागाळातील लोकांना समजावे यासाठी आता वाड्या वस्त्यावर जावून जागृती करावी असे मत या बैठकीत विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधंीनी व्यक्त केले आहे.