‘विठ्ठल व मुबारक’ या दोन शिक्षक मित्रांनी शेकडो शेतकऱ्यांसाठी काढला मार्ग ; पाण्याला वाट करून दिली
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव, गंगेवाडी ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावं… या गावांचं जिथं शिवार संपतं… तिथं मराठवाड्यातील आजच्या धाराशिव जिल्ह्याची हद्द सुरू होते… कधीकाळी सोलापूर जिल्ह्यातील या सीमावर्ती गांवाहून मराठवाड्याची दळण-वळणाची नाळ जोडणारा मार्ग आणि प्रमुख ठाणे म्हणूनही या गावाकडे पाहिलं जात होतं. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही शासन दुर्लक्षित मार्ग म्हणून स्वतःची ओळख कायम ठेवून आहे, तो हाच कासेगांव-देवकुरुळी मार्ग… या मार्गावर सोनहिरा जनमानसात ओळख असलेल्या नाल्याजवळ शेतकऱ्यांना वाट काढताना नाकी नऊ येत होते. या सोनहिऱ्यातील दरवर्षी साठणाऱ्या पाण्याला कासेगावातील विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी लोकवर्गणीतून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे तो निश्चितच कौतुकास्पद मानला जातोय.
कासेगावापासून देवकुरुळी गावाला जोडणारा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या गायरान तथा सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्राजवळून जातो. या अवघ्या पाच किलोमीटरचं अंतर असलेल्या रस्त्यावर सुमारे तीन दशकापूर्वी एकदाच मनुष्यबळावर खडीकरणाचं काम झालं असल्याचे शेतकरी सांगतात. याच खडीच्या आणि दगड-गोट्यांच्या खाचखळग्यातून बळीराजा आपली शेती कसण्यासाठी ठेचा खात जातोय.
पावसाळ्यात तर देवकुळी रस्त्याची पार दुर्दशा झालेली असते, त्यातच सोनहिरा म्हणून सर्व परिचित असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन 1972 च्या दुष्काळात कासेगाव चा बाजार तलाव म्हणून बांधलेल्या आणि आज निधीला महसुली क्षेत्र गंगेवाडी चा नकाशात असलेल्या पाझर तलावात जाऊन मिळते. या सोनहिऱ्यात पावसाळ्यात सहजा-सहजी गुडघ्या, मांड्याइतकं त्यातून देशाच्या प्रगतीचा कणा म्हणून पाहिला जात असलेला बळीराजा वाट काढत निघतो.
ही समस्या या परिसरातील सर्व शेतकरी आणि शेतकरी कुटुंबीयांची शेतमजूर आणि महिला मजुरांची आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन आणि लोक वर्गणी करून इथं थांबणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे, तो कौतुकास्पद आहेच, त्याचवेळी या रस्त्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी डोळसपणे पाहण्याचीही तितकीच गरज आहे, हे मात्र नक्की !