सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील हत्तुरे फॅमिलीला मोठा धक्का बसला असून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेला मैनुद्दीन हत्तुरे याला दोन वर्षाकरिता दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
इसम नामे, मैनोद्दीन म. रफिक हत्तुरे, वय-३२ वर्षे, रा. ४०३, हत्तूरे कॉम्प्लेक्स, बेगम पेठ, सोलापूर याचेविरुध्द सन २०१६,२०२१,२०२२ व २०२५ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, मुलींना जबरदस्तीने पळवून नेणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.२७८२/२०२५ दि.१७/१०/२०२५ अन्वये, इसम नामे, मैनोद्दीन म. रफिक हत्तुरे, वय-३२ वर्षे, रा. ४०३, हत्तूरे कॉम्प्लेक्स, बेगम पेठ, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.